सातत्यपूर्ण कामगिरी राखण्याचे ध्येय – राही सरनोबत

मुंबई – करोनाचे संकट असतानाही सरावा परवानगी मिळाल्याने पुन्हा एका सरावाला प्रारंभ केला आहे. आता येत्या काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी सज्ज होत असल्याचे भारताची अव्वल नेमबाज राही सरनोबत हिने सांगितले आहे.
टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे गेल्यामुळे मिळालेला वेळ सत्कारणी लावता आला. या काळात

आवश्‍यक असलेली विश्रांती मिळाली. आता सरकारने क्रीडा संकुले खुली करून खेळाडूंना वैयक्‍तिक सरावालाही परवानगी दिल्यामुळे पुन्हा एकदा रेंजवर येता आले व सरावाला प्रारंभ करता आला. गेल्या मोसमात जशी कामगिरी झाली त्यापेक्षाही जास्त सातत्यपूर्ण कामगिरी या मोसमात करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी आता सुरू झालेला सराव खूपच महत्त्वाचा आहे, असेही राहीने सांगितले.

करोनाचा धोका वाढल्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाला. तसेच खेळाडूंना आपापल्या घरातच राहावे लागले. तसेच सर्व स्तरावरील क्रीडा स्पर्धा एकतर स्थगित करण्यात आल्या, रद्द करण्यात आल्या किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या. त्यामुळे खेळाडू निराश झाले. हीच परिस्थिती माझीही झाली होती. मात्र, आता सरावाला प्रारंभ केल्यामुळे पुन्हा एकदा सर्व गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहात आहे. येत्या काळात सरावात वाढ करून आगामी स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळविणे हेच ध्येय आहे, असेही राही म्हणाली.

नेमबाजी क्रीडा प्रकारात राही 25 मीटर पिस्तूल गटात भारताचे प्रतिनिधित्व करते. तिने आजवर कारकिर्दीत विश्‍वचषक स्पर्धेत 2 सुवर्ण व एक ब्रॉंझपदक पटकावले आहे. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत 2 सुवर्ण व एक रजतपदक पटकावले आहे. त्यातही आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण व एक ब्रॉंझपदकाची कमाई केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 25 मीटर नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी राही पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

नेमबाज ऑलिम्पिक गाजवतील….

2004 च्या ऑलिम्पिकपासून सातत्याने भारतीय नेमबाजांनी चांगलेच यश मिळवले आहे. टोकियो ऑलिम्पिकदेखील याला अपवाद नसेल. येत्या काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये पात्रता मिळवून प्रत्यक्ष ऑलिम्पिक स्पर्धेत यावेळीही भारतीय नेमबाज यशस्वी कामगिरी करतील, असा विश्‍वासही राहीने व्यक्‍त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.