कलाग्राम ठरणार शहराचे वैभव – मिसाळ

पुणे – पुणेकरांसह, जगभरातील पर्यटकांना भारताच्या प्रत्येक राज्यातील संस्कृती, लोककला तसेच त्यांची ग्रामीण संस्कृतीची झलक सिंहगड रस्त्यावरील पु.ल. देशपांडे उद्यानात साकारण्यात येणाऱ्या कलाग्राममधून पाहावयास मिळणार आहे.

हे कलाग्राम शहराची नवी ओळख आणि वैभव ठरेल, असा विश्‍वास पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. मिसाळ यांनी शनिवारी सारसबाग येथे मॉर्निंगवॉक घेत मतदारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मतदारसंघात आपल्या प्रयत्नातून साकारण्यात येणारे कलाग्राम तसेच उद्यानांच्या बहुद्देशिय उपक्रमांची माहिती दिली. नगरसेविका स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, राजश्री शिळीमकर, स्वीकृत नगसेवक रघु गौडा, बिपीन पाटोळे, शैलेश देशपांडे, शैलेश आंदेकर, प्रतीक देसरडा, महादेव कातुरे, जितेंद्र पोळेकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मिसाळ म्हणाल्या, कलाग्राम प्रकल्प “दिल्ली हट’च्या धर्तीवर सुमारे साडेतीन एकर जागेत साकारण्यात येत असून त्यासाठी आतापर्यंत 11 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पात बांबू व दगडापासून तयार होणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन, हस्तकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी गाळे, ऍम्पीथिएटर असे वेगवेगळे उपक्रम असणार आहेत. या ठिकाणी हौशी व नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.