तिची चूक असल्याचा न्यायालयाचा निष्कर्ष : 5 लाख 98 हजार रुपये मिळणार
पुणे – निष्काळजीपणे चालत्या पीएमपीएमएलमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करणे तरूणीला महागात पडले आहे. तोल जाऊनपडली व पायावरून चाक गेल्याने तिला कायमस्वरूपी 51 टक्के अपंगत्व आलेच. मात्र, मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे 11 लाख 97 हजार 513 रुपये नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असतानाही तिच्या निष्काळजीपणाने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढत निम्मी रक्कम देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य प्रदीप अष्टुरकर यांनी दिला आहे. त्यामुळे तिला 5 लाख 98 हजार 766 रुपये मिळणार आहेत. रक्कमेवर अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक 9 टक्के व्याज देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.
पीएमपी, बसचा मालक आणि विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात जखमी 24 वर्षीय तरूणीने मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे तक्रार दाखल केली होती. विमा कंपनीच्या वतीने अॅड. मनोहर माहेश्वरी आणि अॅड. प्रणिता वाळवेकर यांनी, तर पीएमपीएमएलच्या वतीने अॅड. अतुल गुंजाळ यांनी काम पाहिले.
4 एप्रिल रोजी 2014 ती तरूणी शिवाजीनगर ते स्वारगेट बसने प्रवास करीत होती. मामलेदार कचेरी येथे सायंकाळी 6.15 च्या सुमारास बसचा वेग कमी झालेला असताना, गाडी पूर्णपणे थांबली नसताना चालत्या बसमधून तिने उतरण्याचा प्रयत्न केला असता ती तोल जाऊन रस्त्यावर पडली. बसचे चाक तिच्या पायावरून गेल्याने ती जखमी झाली.
बसचालक आणि लोकांनी तिला उपचारासाठी ससून येथे नेले. तेथून अधुनिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन महिन्यापेक्षा जास्त काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात रहावे लागले. तिने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ही तक्रार दाखल केली.
पोलिसांनी बसचा चालक अपघातास जबाबदार असल्याचे सांगत गुन्हा दाखल केला. मात्र, तिने चालत्या बसमधून उतरण्याचा प्रयत्न केल्याचे विमा कंपनीचे वकील माहेश्वरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.