कुरकुंभ (प्रतिनिधी) – यश मिळविण्यासाठी कौटुंबिक परिस्थितीची नाही तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाची गरज असते हे दहावीत शिकणाऱ्या साक्षी शिंदे या विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे. नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल बुधवारी (दि.29) जाहीर झाला,यामध्ये कुरकुंभ येथील श्री फिरंगाईमाता विद्यालयातील साक्षी शिंदे ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत 97.00 टक्के मिळवित विद्यालयात पहिली आली आहे.
साक्षीचे वडील कुरकुंभ येथील पेट्रोल पंपावर काम करतात तर आई अंगणवाडी मध्ये काम करते. साक्षीची परिस्थिती एकदम हलाखीची असून कुरकुंभ येथे घर सोडले तर काहीच स्थावर मालमत्ता नाही. काम केले तरच घरचा उदरनिर्वाह चालतो. साक्षीची घरची परिस्थिती बेताची असल्याने ती शाळेतून घरी गेल्यावर आईला घर कामात मदत करत असे. आई वडिलांना दोन्ही मुलीच असल्याने मुलाची उणीव कधीच साक्षीने आई वडिलांना भासू दिली नाही. मुलगी ही घराचे नावलौकीक करू शकते तिने हे आज दाखवून दिले, अशा या हलाखीच्या परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत 97.00 टक्के मिळवित विद्यालयाचे, गावाचे नावलौकिक केले आहे.
एकीकडे सर्व सोयी-सुविधा घेऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालकांनी याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. परिस्थितीशी सामना करीत उत्तम गुणवत्ता समजापुढे ठेवणाऱ्या या विद्यार्थिनीचे ग्रामस्थांकडुन ही कौतुक होत आहे. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य केशवराव शितोळे, कार्याध्यक्ष अनिल शितोळे, सचिव सचिन शितोळे, प्राचार्य नानासाहेब भापकर, कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले,पोलीस पाटील रेश्मा शितोळे, ग्रा.स.विनोद शितोळे, पर्यवेक्षक सिकंदर शेख, संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद, ग्रामस्थ यांच्याकडून साक्षीचे कौतुक होत आहे.