नगर – सातव्या वेतन आयोगाचा विषय अजेंड्यावरुन टाळण्यात आल्यामुळे नाराज कामगार युनियनने आंदोलनाचा इशारा देताच या विषयासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभेचा पुरवणी अजेंडा जारी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंगळवारी (दि.16) होत असलेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय अजेंड्यावर येणार आहे.
महापालिकेच्या विविध विषयांसाठी येत्या मंगळवारी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेचा अजेंडा निघत असतांनाच कर्मचाऱ्यांनी महापौर वाकळे यांची भेट घेऊन सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्याची मागणी केली होती. महापौर वाकळे यांनी पुढील आठवड्यात पुन्हा सभा काढून सदरचा विषय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अजेंड्यावर विषय न घेण्यात आल्यामुळे मनपा कामगार युनियनने महापौरांना पत्र देऊन 15 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
तसेच नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनीही महापौर वाकळे यांना पत्र देऊन सातवा वेतन आयोगाच्या विषयासाठी पुरवणी अजेंडा काढण्याची किंवा विशेष महासभा घेण्याची मागणी केली होती. युनियनच्या आंदोलनानंतर महापौर कार्यालयाकडून या विषयासाठी बुधवारी सायंकाळी हालचाली होऊन पुरवणी अजेंडा काढण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर घेण्यात आला आहे.