जिल्हा परिषदेचे अनेक वर्षांपासून बंद असलेले प्रवेशद्वार अखेर उघडले

नगर – जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीजवळ असलेले अतिक्रमणे दोनदा हटविण्यात आलेले असले तरी जैसे थेच आहेत. परंतु ही अतिक्रमण हटाव मोहिम राबविल्यामुळे जिल्हा परिषदेचे अनेक वर्षांपासून बंद असलेले प्रवेशद्वार उघडून त्यातून आज (सोमवार)पासून वाहने बाहेर पडण्यास सुरवात झालेली आहे.

जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंती लगत सुमारे 40 जणांनी अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटलेले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर असलेले अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सूचना दिल्या.

त्यानंतर अतिक्रमण विभागाने हे अतिक्रमण दोनदा हटविले. त्याच वेळी प्रवेशद्वार दोन उघडे करण्यात यावे, या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर प्रवेशद्वार एकमधून चारचाकी वाहनांना प्रवेश देऊन दोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर यावर कारवाई करण्यात आली. आज प्रवेशद्वार दोनमधून वाहने बाहेर पडू लागलेली आहेत. प्रवेशद्वार दोन वाहतुकीस खुले करावे, या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र त्यांनी त्याकडे गांभिर्याने लक्ष दिले नव्हते.

मात्र नव्याने हजर झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी स्वतःहून जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पुढाकार घेऊन प्रवेशद्वार दोन खुले केल्यामुळे त्यांचे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमधून अभिनंदन होत आहे. जिल्हा परिषदेप्रवेशद्वार दोन व एक परिसरात रिक्षा उभ्या राहत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पोलिस प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.