गॅस दरवाढीने स्वयंपाकघराचे गणित कोलमडले

मंचर येथे केंद्र सरकारविरोधात नारेबाजी

मंचर- येथे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाच्या महिलांनी केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात गुरुवारी (दि. 13) निषेध आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आंबेगाव तालुका अध्यक्षा सुषमा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर मंचर उपविभागीय अधिकारी कार्यालयात गॅस दरवाढी विरोधात निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांनी दरवाढ केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात मंचर (ता. आंबेगाव) येथे आंदोलन करण्यात आले. मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा आणि निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आंबेगाव तालुका अध्यक्षा सुषमा शिंदे, खेड तालुका अध्यक्षा संध्या जाधव, जुन्नर तालुका अध्यक्षा सुरेखा वेठेकर,पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात यांसह असंख्य महिला उपस्थित होत्या.

यावेळी मंचर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात गॅस दरवाढ कमी व्हावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याने डोळ्यात पाणी आणलं, त्याच्या भाववाढीतून सावरत असताना आता गॅस सिलिंडरचेही “भाव’ वाढल्याने “स्वयंपाकघरा’चे गणित बिघडले असल्याने महिला संतप्त झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.