जनजागृतीचे होर्डिंग्ज सोशल मीडियावर “ट्रोल’
पुणे – स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून पुण्याला मान देण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहर चकाचक ठेवत पुणेकरांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. त्याचवेळी सर्वेक्षण आणि जनजागृतीसाठी लावलेल्या होर्डिंग्जवर महापालिकेने मराठी शुद्धलेखनाची ऐशी की तैशी केली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पालिकेच्या या होर्डिंग्जवरून पालिकेचा खरपूस समाचार घेतला आहे.
शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राची टीम गुपचूप दाखल झाली आहे. त्यांच्याकडून महापालिकेस कोणतीही कल्पना न देता शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे याबाबत पुणेकरांना माहिती असावी, तसेच नागरिकांनीही शहरात स्वच्छता ठेवावी, यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेच्या जाहिरातीचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यातील काही होर्डिंग्जवर अतिशय भयंकर स्वरूपात भाषिक चुका करण्यात आल्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी ही होर्डिंग्ज लागली असून, चोखंदळ पुणेकरांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर “व्हायरल’ करत यावर “ट्रोलिंग’ सुरू केले आहे.