जेजुरी-कडेपठारावर गणपूजा उत्सव साजरा

जेजुरी – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा गणपूजा उत्सव मूळ स्थान कडेपठार मंदिरावर मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. यावेळी जेजुरीकर ग्रामस्थ, मानकरी, खांदेकरी, सेवेकरी यांच्यासह नित्यवारी करणाऱ्या भाविकांनी कडेपठारी मोठी गर्दी केली होती.

श्री भगवान शंकर महादेव जगत्कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. यादिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडाऱ्याने पूजा केली तेव्हापासून हा शुभ दिवस “गणपूजा’ या नावाने ओळखला जातो. आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कडेपठार देवता लिंग मंदिरामध्ये रात्री नित्य नेमाची पूजा झाल्यानंतर मानकरी देवावर भंडार वाहतात. त्यापाठोपाठ सर्व भक्तमंडळी भंडार वाहतात. अशा पद्धतीने स्वयंभू लिंगावर भांडाराच्या राशी उभ्या राहतात. त्यानंतर देवाची आरती होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना निघतो तो रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये चालतो.

श्रींचा छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवाच्या अंगावरील भंडार भाविक-भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो. या प्रसंगी मंदिरामधील सर्व सजावट निलेश बारभाई, अविनाश बारभाई, अनुराज बारभाई, मंदार सातभाई, सिद्धार्थ आगलावे, शुभम मोरे, विशाल लांगी, प्रसाद सातभाई यांनी केली असून देवाचा छबिना अनिल आगलावे यांनी धरला होता. राजेंद्र मोरे, प्रथमेश मोरे, सुधाकर मोरे, स्वप्निल मोरे, गणेश मोरे, समीर मोरे, ऋषिकेश मोरे, निलेश मोरे आदींनी सनई आणि डोळ्याच्या वादनात छबिना रंगविला.

ट्रस्टच्या वतीने विश्‍वस्त वाल्मीक लांगी, सचिव सदानंद बारभाई, कर्मचारी दीपक खोमणे, किरण शेवाळे, सचिन शेवाळे, शंकर आगलावे, नागनाथ बामनकर, धनंजय नाकाडे उपस्थित होते. या उत्सवासाठी विशेष सहकार्य मार्तंड देव संस्थांचे विश्‍वस्त पंकज निकुडे, राजकुमार लोढा, कर्मचारी नितीन कुदळे, मंगेश चव्हाण, अमोल खोमणे, निलेश खोपडे, मंगेश चव्हाण आदींनी केले. ट्रस्टच्या वतीने वाघ्या मुरुळी या लोककलावंतांना सन्मानपत्र देण्यात आले. भंडारा वाटप झाल्यानंतर गणपूजेची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.