फलटण (प्रतिनिधी) – घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या, चाकू, कोयता अशा घातक हत्यारांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात फलटण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी ताथवडा घाटात ही कारवाई केली. या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून त्यांचे दोन साथीदार पळून गेले.
योगेश बाजीराव मदने (वय 30, रा. राजापूर, ता. खटाव), सनी ऊर्फ सोन्या धनाजी भंडलकर (वय 23, रा. चौधरवाडी, ता. फलटण), प्रथमेश उर्फ सोनू हणमंत मदने (वय 21, रा. उपळवे, ता. फलटण) व किशोर हणमंत जाधव (वय 19, रा. ताथवडा, ता. फलटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (वय 25, रा. मोती चौक, फलटण) व किरण मदने (पूर्ण नाव माहीत नाही, रा. राजापूर, ता. खटाव) हे पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उपनिरीक्षक शेख व कर्मचारी काल (दि. 1) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास फलटण-पुसेगाव रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी ताथवडा घाटातील दुसऱ्या वळणावर तीन बजाज पल्सर मोटारसायकली घेऊन सहा जण थांबलेले दिसले. पोलिसांची गाडी पाहून त्यातील दोन जण मोटारसायकलवरून पळून गेले. पोलिसांनी उर्वरित चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे व पत्ते सांगितले.
त्यांच्याकडे चाकू, कोयता अशी हत्यारे सापडली. त्याबाबत चौकशी केली असता, ताथवडा, ता. फलटण येथे एका घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिले. मोटारसायकलवरून पळून गेलेल्या दोन संशयितांचा पोलिसांनी पाठलाग केला; परंतु ते सापडले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी संशयितांकडून 80 हजार 40 रुपये किमतीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.