नगर (प्रतिनिधी) – विविध बँकांचे बनावट धनादेश तयार करून त्याद्वारे कोट्यावधी रुपयांची रोकड काढण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केली. त्यांच्याकडून बनावट शिक्के, मोबाइल, विविध बँकांचे बनावट धनादेश हस्तगत केले आहेत.
विपूल नरेश वक्कानी (वय 40, रा. कवडे पाटील कॉर्नर, बी. टी. कवडे रोड घोरपडी गाव, मूळ खराडी पुणे), यशवंत दत्तात्रेय देसाई (वय 49, रा. शाहूनगर, चिंचवड पुणे), नरेश रामचंद्र बालकोंडेकर(वय 33, रा. भोसरी पुणे), राहुल ज्ञानोबा गुळवे(वय 46, रा. वाघोली, पुणे), तुषार आत्मराम कुंभारे (रा. वाघोली, पुणे), विजेंद्र दक्ष (रा. साऊथ दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, सावेडी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये एक व्यक्ती दिल्ली महानगरपालिकेच्या नावाने असलेला अडीच लाख रुपयांचा धनादेश वटवण्यासाठी आला आहे.
त्यानुसार पोलीस पथकाने खात्री करून स्टेट बँकेत सापळा लावून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने दोन सहकारी बाहेर उभे असल्याचे सांगितले. पोलिसांनी बाहेर जाऊन त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता सहा मोबाइल, वेगवेगळ्या पाच कंपन्यांचे बनावट शिक्के, स्मॉल फायन्यास, आंध्र बॅक, एचडीएफसी बँक, एस बँक, फेडरल बँक, आयसीआयसी बँक, एक्सीस बँक, आजरा अर्बन को-ऑप बँक या बँकांचे कोरे धनादेश पुस्तक व वेगवेगळ्या नावाने रकमा भरलेले काही धनादेश व एक मोटारकार असा वीस लाख 85 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिल्ली महापालिकेच्या नावाने असलेला अडीच कोटींचा धनादेश जप्त केला.
दरम्यान, ताब्यात घेलल्या तिघांकडे अधिक चौकशी केली असता अडीच कोटींचा धनादेश राहुल गुळवे व संदीप भगत यांनी दिल्याचे सांगितले. त्यावरून राहुल गुळवे याला ताब्यात घेतले असता तो धनादेश दिल्ली येथील साथीदार विजेंद्र दक्ष याने पुणे येऊन दिल्याचे सांगितले. त्यातील काही धनादेश तुषार कुंभारे याला वटविण्यासाठी दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी राहुल गुळवे याच्या घराची झडती घेतली असता दोन बनावट शिक्के, एक मोबाइल, सहा कोटींचे धनादेश असा दहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिस कर्मचारी रवीकिरण सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीसह विविध कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, पोलीस कर्मचारी रवीकिरण सोनटक्के,संदीप पवार, दिनेश मोरे, शंकर चौधरी, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली.