पुणे – कर्जाच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा खडक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चेन्नई येथून दोघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्या ताब्यातून मर्सिडीज बेंझ, इनोव्हा या महागड्या चारचाकींसह चार मोबाइल असा 80 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. यातील मुख्य आरोपी मात्र फरार झाला आहे.
व्ही.एम.महंम्मद दाऊद खान (28), आर. कार्तिक रविकुमार (32, दोघेही रा. पन्नायूर, चेन्नई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आधी पुण्यातील दोघा एजंटांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी पुण्यातील एकाची 25 कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने दीड कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “फिर्यादी माने यांचा टॅक्स ऍन्ड बिझनेस कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी 25 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याने, त्यांनी पुण्यातील ओळखीच्या पंकज पांडे याच्याशी संपर्क साधला होता. पांडेने जयंत गायकवाड, सात्विक चंद्रशेखर, अविनाश गुराप्पा, समीर अली यांच्या माध्यमातून माने यांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यापोटी त्यांना मुख्य आरोपींकडून कमिशन मिळणार होते. पांडे व गायकवाड हे माने यांना चेन्नई येथे घेऊन गेले होते. तेथे मुख्य आरोपी समीर मोहंमद अलीने कर्ज मंजूर करुन देण्याचा बहाणा करत 1 कोटी 52 लाख रुपये ऍडव्हान्स जमा करण्यास सांगितले होते.
ही रक्कम एका आलिशान बंगल्यातील कार्यालयात स्वीकारण्यात आली होती. त्यांनी माने यांच्या सेवेत एक आलिशान कारही ठेवली होती. मात्र, नंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचे कर्ज न देता फसवणूक केली. तक्रार दाखल झाल्यावर खडक पोलिसांचे पथक चेन्नईला रवाना झाले होते. तेव्हा आरोपींचा पत्ता आणि नावे सर्व खोटी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांचा शोध लागत नव्हता. मात्र त्यांच्या गाडीच्या नंबरवरुन आरोपींचे खरे नाव व पत्ता शोधण्यात आला. यानंतर खडक पोलिसांच्या एका पथकाने पुन्हा चेन्नईला जाऊन दोघांना अटक केली. मात्र, मुख्य सूत्रधार समीर मोहंमद अली फरार झाला. आरोपींनी अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.
याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, तपास पथकाचे उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस अंमलदार बंटी कांबळे, समीर माळवदकर, अमेय रसाळ, संदिप पाटील, राहुल मोरे यांच्या पथकाने केली.