तीन बालकांसह सहाजण ताब्यात, कोतवाली पोलिसांची कारवाई
नगर – केडगाव परिसरात टायरचे दुकान फोडणारी टोळी 24 तासांच्या आत कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. सहा जणांना ताब्यात घेतले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. तीन विधिसंघर्षग्रस्त बालके होती.
अटक केलेल्यांमध्ये मनोज बोठे वय 22 वर्ष,रा. पारगाव मौला, ता.नगर, अभिषेक अर्जुन करंजुले वय 20 वर्ष, रा. पंचशील हॉटेल मागे, पाडळी राजणगाव,सुपा, ता.पारनेर, बाळासाहेब रामभाऊ पुंड वय 40 वर्ष, रा. शिंगवे तुकाई, ता.नेवासा यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रितेश संजय बाफ ना रा. समर्थनगर लिंकरोड, केडगाव यांचे पुणे हायवे रोडवर केडगाव शिवारात हॉटेल अरूणोदय .शेजारी अरिहंत टायर्सचे दुकान आहे. रात्रीच्या सुमारास दुकानाचे मागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानातील विविध कंपन्यांचे 515 टायर्स व दुचाकी, चारचाकी वाहनाच्या 720 रबर ट्यूब असा दुकानातील एकूण 9 लाख 47 हजार 300 रूपये किमतीचे माल अज्ञात चोराने चोरून नेला होता.
सदर गुन्हा दाखल होताच घटना घडले ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी घटनास्थळी भेट देवून संबंधितांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. सदर चोरीचा माल सुपा गावात विक्रीस आणणार असल्याचे समजल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला असून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. अवघ्या चोबीस तासात या गुन्ह्याचा छडा लावल्याने पोलिसांचे सर्वांनी कौतुक करत प्रत्येक गुन्ह्यात अशीच तत्परता दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.