भोपाळ – मध्यप्रदेशात विधानसभेच्या 28 रिक्त जागांसाठी होणारी पोटनिवडणूक त्या राज्यातील भाजप सरकारचे भवितव्य ठरवणार आहे. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला पोटनिवडणुकीत किमान 9 जागा जिंकणे आवश्यक आहे.
कॉंग्रेसला रामराम ठोकत मध्यप्रदेशातील 25 आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तर, 3 आमदारांचे निधन झाले. त्यामुळे त्या राज्यातील विधानसभेच्या 28 जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.
त्या पोटनिवडणुकीच्या निकालावर भाजप सरकारचे अस्तित्व अवलंबून आहे. कॉंग्रेसमधील बंडखोरीमुळे भाजपला मध्यप्रदेशात पुन्हा सरकार स्थापन करणे शक्य झाले.
आता ते सरकार तरणार का याचे उत्तर पोटनिवडणुकीमुळे मिळणार आहे. मध्यप्रदेश विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 इतके आहे. सध्या ते 202 पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे 107 भाजप आमदारांच्या जोरावर तूर्त सरकारकडे बहुमत आहे. मात्र, पोटनिवडणुकीतून सर्व जागा भरल्या जाणार असल्याने सरकारला बहुमतापर्यंत पोहचण्यासाठी भाजपला 116 हा आकडा गाठावा लागणार आहे.
प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे 88 आमदार आहेत. त्या पक्षाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पोटनिवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व 28 जागा जिंकाव्या लागणार आहेत.