भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल – भगतसिंह कोश्‍यारी

मुंबई, – नव्या पिढीमध्ये नृत्यकलेबद्दल विशेष आस्था दिसून येत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या योग, संगीत व कलेच्या सांस्कृतिक ठेव्याकडे आहे. अशा वेळी, नृत्यकलांचा प्रचार व प्रसार झाला व त्यात संशोधन झाले तर सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले.

श्री श्री सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड रिसर्च इन कथक, श्री श्री विद्यापीठ, कटक व इंदोर येथील नटवरी कथक नृत्य अकादमी यांनी संगीत नाटक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कथक परिषदेचे उद्‌घाटन आज राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले.

राज्यपाल कोश्‍यारी म्हणाले, भारतीय कला व संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. मात्र दोनशे वर्षांच्या परकीय राजवटीत पाश्‍चात्य संस्कृतीच्या उदात्तीकरणामुळे आपली संस्कृती झाकोळली गेली. आज जगाचे लक्ष संगीत, नाट्य, कला, क्रीडा, संस्कृती व योग या विषयातील भारताच्या अथांग सांस्कृतिक ठेव्याकडे आहे. जसजसे या विषयांत संशोधन होईल, तशी यातून नवनवी रत्ने हाती लागतील. श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कथक परिषदेमुळे कथक, भरतनाट्यम तसेच इतर सर्व शास्त्रीय नृत्यकलांचे पुनरुत्थान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.