दिग्गजांसह 73 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद

लोकसभा पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ मतदारसघांत चुरस

सातारा : पावसाने दिवसभर पूर्ण उघडीप दिल्याने सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यात उत्साहाच्या वातावरणात मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत सुमारे साठ टक्के मतदान झाले असून मतदानाच्या या टक्केवारीत आणखी वाढ होण्याची निश्‍चिती आहे. त्यामुळे चुरस असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि विधानसभा मतदारसंघांतील दिग्गजांसह 73 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. गुरूवारी दि. 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुती आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या भाजपने गेल्या पाच वर्षात जिल्हा पोखरून काढत वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आव्हान निर्माण केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचाली गतीमान झाल्या. शिवसेना व भाजपमध्ये अनेकांनी पक्षांतर केले. त्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांनी आमदारकीचे राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकामागून एक धक्के बसत होते. त्यातच उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पुरती घायाळ झाली.या पार्श्‍वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्यावर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून श्रीनिवास पाटील हे दोन प्रमुख रिंगणात उतरले. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्र होत.

असल्याने सर्वच मतदारसंघात चुरस निर्णाण झाली. विधानसभा निवडणुकीतही मातब्बर उमेदवारांनी जोरदार प्रचार करीत रंगत वाढवली. त्यामुळे सर्वच ठिकाणी चुरस वाढली. त्यातही कराड दक्षिण, कराड उत्तर व माण मतदारसंघात तिरंगी लढतीमुळे प्रतिष्ठा पणाला लागली.
कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कॉंग्रेस), भाजपचे अतुल भोसले व अपक्ष बंडखोर उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यातील लढत लक्षणीय ठरली आहे. कराड उत्तरमध्येही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब पाटील यांना शिवसेनेच्या धैर्यशील कदम यांनी आव्हान दिले असताना भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे यांनी चुरस निर्माण केली. माणमध्ये जयकुमार गोरे यांच्याविरोधात “आमचं ठरलयं’ ने सर्वपक्षीय आघाडी निर्माण करीत आव्हान दिले. त्यांच्या वतीने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख रिंगणात आले. गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने माणमधील लढत मैत्रीपूर्ण ठरली. वाईत राष्ट्रवादीचे मकरंद पाटील व भाजपचे मदन भोसले यांच्यातील लढत पारंपरिक पद्धतीने रंगली होती.

सातारा मतदारंसघात पारंपरिक शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि दीपक पवार यांच्यातच पक्ष बदलून लढत झाली. पाटणमध्ये शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर यांच्यातच अटीतटीचा सामना रंगला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या वतीने प्रचारात स्टार प्रचारक आल्यामुळे निवडणुकीत सर्व पक्षांना बळ मिळाले. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जिल्ह्यातील प्रचारात जान आणली. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांनीही सभा घेतल्या. यामुळे बहुतेक सर्व मतदारसंघांत तुल्यबळ लढती ठरल्यामुळे आता सर्वांचे निकालाकडे लक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.