मुंबई : राज्यात आज दोन मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. बाळासाहेबांच्या जयंती दिनीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षामध्ये नवी उमेद पेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचे संकेत मनसेने बाळासाहेबांना वाहिलेल्या आदरांजलीतून दिले आहेत.
मनसेच्या अधिकृत खात्यावरून बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे या तीन पिढ्यांचा फोटो ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले आहे. विचारांचा आणि कृतीचा वारसा इतका उत्तुंग आणि यथायोग्य आहे की वर्तमान आणि भविष्याला संघर्षाचं ओझं कधीच वाटू शकत नाही!, अशा शब्दात मनसेने शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले आहे.
विचारांचा आणि कृतीचा वारसा इतका उत्तुंग आणि यथायोग्य आहे की वर्तमान आणि भविष्याला संघर्षाचं ओझं कधीच वाटू शकत नाही!#बाळासाहेब_ठाकरे_जयंती #मनसेअभिवादन pic.twitter.com/wbMrhYKWCm
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साजरी होत असताना गोरेगाव येथील नेस्को मैदानातील सभागृहात मनसेचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात नव्या झेंड्याचं अनावरण राज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचे अनावरण केले.
अधिवेशनाच्या ठिकाणी सभागृहात भव्य स्टेज उभारण्यात आला असून स्टेजवर महापुरुषांच्या फोटोंमध्ये प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांचाही यामध्ये समावेश आहे.