…अन्‌ सतरा वर्षे पडून असलेल्या सांगाड्यावर पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

पुणे – कोथरूड पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात मागील सतरा वर्षे एका तरुणाचा सांगाडा तसाच पडून होता. या खून प्रकरणातील आरोपी निर्दोषदेखील सुटले होते. राहिला होता प्रश्‍न तो अंत्यसंस्कार कोणी करायचे, याचा. अखेर न्यायालयाचा आदेश पुन्हा मिळवून पोलिसांनी या सांगड्यावर नुकतेच अंत्यसंस्कार केले. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांत धूळखात पडलेल्या मुद्देमालाची न्यायालयाच्या आदेशाने विल्हेवाट लावण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिले होते. त्यानुसार या सांगाड्यासंदर्भात आदेश मिळवून अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकरण काय?
कोथरूड भागातील एमआयटी टेकडीच्या परिसरात सन 2002 मध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. याची ओळख पटलेली नव्हती. दोन वर्षांनंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला. कोथरूड भागातील सोळा वर्षीय मुलगा निखिल रणपिसे याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. निखिलच्या मित्रांनी एका नातेवाईकांच्या घरी चोरी केली होती. चोरीतील पैशांच्या वाटणीतून निखीलचा खून दोन मित्रांनी केल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणात त्याच्या दोन मित्रांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. या खटल्यात न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी दोन्ही मित्रांची 2006 मध्ये निर्दोष मुक्तता केली. निकालावेळी न्यायालयाने सांगड्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी तत्कालिन पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली आणि सांगडा मुद्देमाल कक्षात पडून राहिला.

आदेशाची प्रत पोलिसांकडे नव्हती
न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अहवालानुसार, सांगाडा निखील रणपिसेचा असल्याचे स्पष्ट झाले होते. पण, सांगड्याची विल्हेवाट लावण्याचे आदेशाची प्रत पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे कोथरूड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर खटके यांनी पुढाकार घेऊन रणपिसे कुटुंबीयांची भेट घेतली. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून पुन्हा आदेश मिळवले. त्यानंतर सांगाड्यावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

रणपिसे कुटुंबीयांनीही दिली परवानगी
मृत निखील रणपिसेचे वडिल 85 वर्षांचे असून आजारपणामुळे ते अंथरूणाला खिळलेले आहेत. पोलिसांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा “सांगड्यावर तुम्हीच अंत्यसंस्कार करा, माझ्या मुलाला मोक्ष मिळेल,’ असे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच “अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत उपस्थित राहू,’ असे त्यांनी पोलिसांना सांगितले. अखेर पोलिसांनी पुढाकार घेऊन या सांगड्यावर नुकतेच विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.