स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मूलभूत प्रश्‍न सुटेना

संगमनेर तालुक्‍यातील पठार भाग विकासापासून अद्यापही वंचितच

संगमनेर  – तालुक्‍याचा पठारभाग म्हटलं की, आजही स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर या भागातील रस्ते, विज, पाणी व आरोग्याच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. रस्ते आहे पण त्यावर खड्डेच खड्डे आहेत. आरोग्य उपकेंद्रे असूनही केवळ कर्मचाऱ्याअभावी बंद आहेत.

सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मूलभूत गरजा आजही तशाच आहे. त्यामुळे पठारभागात विकासाची पहाट तरी कधी उगवणार असा प्रश्‍न नागरिक विचारत आहे. नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पठारभागाकडे पाहिले जात आहे. आजही या भागातील सर्वसामान्य महिलांच्या डोक्‍यावरील पाण्याचा हंडा खाली आला नाही. पाण्यासाठी महिलांना रानोमाळ फिरावे लागत आहे. तर तासंतास पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची वाट पहायला लागत आहे.

काही आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही कड्या कपाऱ्याचा आधार घेवून आपली तहान भागवावी लागत आहे. पण पठारभागाला अद्यापही शाश्‍वत असे पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यासाठी कोणी उपाय योजनाही केल्या नाहीत. त्यामुळे उन्हाळा म्हणलं की, पाण्यासाठी रानोमाळ फिरल्याशिवाय पर्याय नाही. पठारभागातील सर्वसामान्य नागरिकांना शाश्‍वत असे पिण्याचे पाणी तरी कधी मिळणार आहे असा प्रश्‍नही आता निर्माण झाला आहे.

वर्षांनुवर्षांपासून नांदूर ते मोरेवाडी, बावपठार सारोळे पठार ते धादवडवाडी, गारोळेपठार, भोजदरी फाटा ते पेमरेवाडी, भोजदरी फाटा ते भोजदरी आदी गावांच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे चित्र रस्त्यांच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. या रस्त्यांवरुन ये-जा करताना शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यांची कामे व्हावीत, म्हणून नागरिकांनी अनेक वेळा पुढारी, लोकप्रतिनिधी आमदार या सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या. पण अद्यापही रस्त्यांची कामे झाले नाहीत. सध्या पावसाळा सुरु असल्याने हे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले आहे. तरीही अशा कठीण परिस्थितीत नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना येजा करावी लागत आहे.

रस्त्यांची कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदानावर बहिष्कारही घातला होता. तेव्हा कुठेतरी त्याची दखल घेतली आहे. त्याचबरोबर भोजदरी फाटा ते भोजदरी या रस्त्याचे काम व्हावे, म्हणून ग्रामस्थांनी उपोषण, रास्ता रोको आंदोलनही केले होते. पण तरीही त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. वर्षानुवर्षांपासून खराब असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी कधी मुहूर्त निघणार आहे असा सवालही संतप्त झालेले गावोगावचे नागरिक करु लागले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुख सुविधा मिळाव्यात, म्हणून पठारभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रेही उभारण्यात आली आहेत. पण तेही कर्मचाऱ्याअभावी बंद अवस्थेत आहेत. फक्त लसीकरणा पुरतेच हे उपकेंद्र उघडली जात आहे. उपकेंद्रांची दयनीय अवस्था असताना याकडे कोणीच लक्ष देत नाही.

आरोग्याच्या बाबतीत तीन तेरा नऊ बारा वाजले आहे. त्यामुळे परिणामी नागरिकांना खासगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत आहे. संगमनेर तालुक्‍याच्या पठारभागाकडे कोणाचेच लक्ष नसल्याने पठारभागाची न घरका न घाटका अशी दयनीय अवस्था झाली आहे. निवडणूका येतात जातात पण पठारभागातील सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही सुटले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.