अथक मेहनतीचे फळ – कोहली

रांची: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा मालिका विजय हे संघातील सगळे खेळाडू, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ सगळ्यांच्याच मेहनतीचे फळ असल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्‍त केले. रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, मयांक अग्रवाल यांनी दाखविलेले सातत्य कौतुकास्पद आहे.

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील विजयामुळे 240 गुणांची नोंद करत अव्वल स्थान मिळविले. या गुणतालिकेत भारताच्या नंतर न्यूझीलंड व श्रीलंका संघ प्रत्येकी 60 गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कसोटी अजिंक्‍यपद मिळविण्यात आता भारतीय संघच आघाडीवर आहे.

फलंदाजांनी रचलेल्या पायावर गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करत कळस चढविला. वेस्ट इंडिज पाठोपाठ याही मालिकेत आम्ही सरस खेळ केला. आता हीच विजयी मालिका यापुढील प्रत्येक मालिकेत कायम राखण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही कोहलीने सांगितले.

पहिल्या सामन्यापासून चुका झाल्या- डुप्लेसी
विशाखापट्टणमच्या पहिल्या कसोटी सामन्यापासूनच आमच्या खूप चुका झाल्या. आम्ही भारतीय फलंदाजांवर दडपण ठेवू शकलो नाही तसेच त्यांच्या गोलंदाजीचा देखील समर्थपणे सामना करू शकलो नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने आम्हाला पराभूत केले. संघबांधणी सुरू असून या चुकांपासुन निश्‍चितच आम्ही शिकू व आगामी मालिकेत यशस्वी होण्याचा प्रयत्न करू.

Leave A Reply

Your email address will not be published.