शेवगावात विखेंची आघाडी

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 65 हजारांच्यावर मताधिक्‍य
प्रा. जनार्दन लांडे पाटील

पहिल्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांचा जल्लोष

पहिल्या फेरीतच भाजपचे डॉ. विखे यांनी आघाडी घेतल्याने शेवगावात मोठा उत्साह संचारला. उल्हसित झालेल्या कार्यकर्त्यांचा आनंद उफाळून आला. येथील शिवाजी चौक व क्रांती चौकात पहिल्या फेरीपासून फटाक्‍यांची आतशबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विखेंची नाराजी घेणे टाळले विधानसभेवर लक्ष ठेवून काही नेत्यांनी विखेंची नाराजी घेण्याचे टाळले, अशी येथे चर्चा असून तसे असेल तर त्याचा खरेच उपयोग होईल का याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे.

शेवगाव  – उमेदवारीच्या बालहट्टाला आई-वडिलांचा विरोध असताना, भाजपसहित सर्वांवर टीकेच्या तोफा डागूनही आणि अनेकांची नाराजी पत्करून ऐनवेळी डॉ. सुजय विखे पाटलांनी भाजपची उमेदवारी मिळवून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मताधिक्‍याने बाजी मारली. डॉ. विखेसह इतर निकालावरून यावेळीही हिंदुत्ववादी मते एकवटली असून सर्वसामान्यांच्या मनात अद्यापही मोदींचा प्रभाव कायम असल्याचे प्रत्ययाला आले.

शेवगाव विधानसभा मतदार संघात विखेंना 65 हजाराच्यावर मताची आघाडी मिळाली. ही आघाडी निश्‍चितपणे लक्षणीय आहे. शेवगाव तालुका घुले बंधूंचा, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. सन 2014 च्या निवडणुकीत भाजपाच्या आमदार मोनिकाताई राजळे 53 हजाराच्या फरकाने विजयी झाल्या. तेव्हाही शेवगाव तालुक्‍यात राष्ट्रवादीला 2082 मते अधिक होती आणि यावेळी तर जनशक्ती मंचाच्या ऍड. शिवाजीराव काकडे, जि. प. सदस्य हर्षदा काकडे यांचीही साथ मिळाली. तरीही राष्ट्रवादीचा प्रभाव दिसला नाही. यावरून अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अंग झटकून काम केले नसल्याच्या चर्चेला पुष्टी मिळते. राष्ट्रवादीच्या नेत्यांना याबाबत आत्मपरीक्षणाची गरज आहे.

या मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे डॉ. विखे यांचे काम केले. त्या स्वतःच्या निवडणुकीत इतक्‍या फिरल्या नसतील एवढ्या हिरिरीने पायाला भिंगरी लावून फिरल्या. स्वकियांची नाराजी काढून त्यांनी सर्वांना कामाला लावले. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनीही सुरुवातीलाच पाथर्डीला आणि दुसऱ्यांदा सांगता सभेला शेवगावला हजेरी लावल्याने येथील मतदार पक्का झाला.

पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे जावई माधवराव नरवडे पाटील शेवगाव तालुक्‍याचे. त्यामुळे बाळासाहेबांचे शेवगावावर विशेष लक्ष होते. त्यांच्याच प्रेरणेने शेवगावात विखे फाउंडेशचे वैद्यकीय महाविद्यालय, आर्टस कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कूल असे शैक्षणिक संकूल व एकनाथ रुग्णालय आकाराला आले आहे. या रुग्णालयाच्या विविध उपक्रमाद्वारे विखे कुटुंब तालुक्‍यात पोहोचले आहे.

स्व. बाळासाहेब विखेंचे निवडणूक तंत्र सर्वांना परिचित होते. ते पुत्र राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय यांनाही आत्मसात आहेच. तरी ऐनवेळी तिकीट मिळूनही भाजपच्या निवडणूक तंत्राची त्यांना मोठी मदत झाली आहे. भाजपाचे एक बुथ टेन युथ तसेच एक बुथ थर्टी युथ आणि अपंग, डॉक्‍टर, वकील, व्यापारी, किसान मोर्चा आदी आघाड्या तयार होत्या. शक्तीकेंद्र प्रमुखाद्वारे प्रत्येक प्रभागात मतदान घडवून आणण्याचे काम झाले. बाहेर फिरण्यापेक्षा आपला गाव व शेजारी सांभाळायचा असे भाजपचे नियोजन होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×