संगमनेर – मुंबई येथील विक्रोळीहून संगमनेरमध्ये 68 वर्षीय महिला आली होती. तिला करोनाचे लक्षणे दिसून आल्याने तिचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. या महिलेचा तपासणी अहवाल सोमवारी (दि.25) रात्री साडेनऊच्या सुमारास आला. त्यात अहवालात ही महिला करोनाबाधित असल्याचे समोर आले. मात्र अहवाल आल्यानंतर काही मिनिटांतच या महिलेचा मृत्यू झाला. संगमनेरात आतापर्यंत 22 करोनाबाधित सापडले असून, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे.
सदर महिला आपल्या भावा सोबत मुंबईहून संगमनेरात आली होती. त्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र फरक पडत नसल्याने या महिलेस घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा त्रास अधिकच वाढल्याने तिला नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिथे तिचा स्त्राव तपासणीस पाठविण्यात आला होता.
सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान या महिलेच्या स्त्रावाचा अहवाल आला. त्यात ती करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. अहवाल आल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतरच या महिलेचा मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 22 असून, मृतांचा आकडा आता चारवर पोहचला आहे. या महिलेच्या संपर्कात आलेला तिचा भाऊ, तिला नगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला
होता. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नगर येथेच तिच्या भावास ताब्यात घेण्यात आले. तसेच या महिलेच्या संपर्कात जास्त कोणी आले नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी कमी झाली.