अयोध्या – अयोध्येत बाबरी मशिदीच्या ऐवजी उभारण्यात येणाऱ्या मशिदीचा आराखडा या शनिवारी जाहीर केला जाणार आहे. तर या मशिदीची पायाभरणी प्रजासत्ताक दिनी केली जाईल, असे या मशिदीच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी सांगितले.
गेल्या 7 दशकांपासून् देशाची राज्यघटना बहुलतावादावर आधारलेली आहे. अयोध्येतील मशिदही याच तत्वावर आधारलेली असणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी 2021 रोजी या मशिदीची पायाभरणी केली जाईल, असे इंडो-इस्लामिक सांस्कृतिक फाऊंडेशनचे सचिव अथर हुसेन म्हणाले.
अयोध्येत मशिद उभारण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाने “आयआयसीएफ’ची स्थापना सहा महिन्यांपूर्वी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश सरकारने उपलब्ध करून दिलेल्या पाच एकर भूखंडावर उभारल्या जाणाऱ्या या मशिदीमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कम्युनिटी किचन आणि ग्रंथालयही असणार आहे. वास्तूचे आर्किटेक्ट एस.एम. अख्तर यांनी केले असून या ब्लूप्रिंटचे उद्घाटन “आयआयसीएफ’च्या वतीने 19 डिसेंबर रोजी केले जाणार आहे.
गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या येथील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या भूमीसंदर्भात ऐतिहासिक निर्णय देऊन राम मंदिर बांधण्याचे निर्देश दिले होते. या भूमीच्या बदल्यात मुस्लिमांना मशिद उभारणीसाठी पाच एकर भूमी देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने अयोध्याच्या सोहावल तलुक्यामधील धन्नीपूर गावात पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.