करोनाची “एन्ट्री’ : तरुणास लागण
खळद – शिवरी (ता. पुरंदर) येथील एका तरुणाचा अहवाल शनिवारी (दि. 8) पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली. दरम्यान, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अभेद्य असणारा शिवरीचा गढ अखेर ढसळला आहे.
सासवड-जेजुरी पालखी महामार्गालगत हे गाव असून याच गावातून वीर भागात जाण्यासाठी रस्ता आहे. दरम्यान, करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, करोना दक्षता समिती व ग्रामस्थ गावचे रक्षण व्हावे यासाठी रात्रीचा दिवस करीत होते. मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत होत्या. तर गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तापमान तपासणी रोज होत होती.
यातूनच आपल्या गावात करोना येण्यापासून आजपर्यंत त्यांनी लढा दिला; मात्र अखेर आज एक करोनो पॉझिटिव्ह सापडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रुग्ण हा गावात प्रवेश करतानाच मुख्य रस्त्याच्या बाजूला राहत असून तो पुणे येथे कामासाठी ये-जा करत असल्याची माहिती मिळाली आहे.
रुग्णास तक्रारवाडी येथील कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले आहे तर या रुणाच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील जवळपास 12 व लो रिस्क कॉन्टॅक्ट मधील 37 नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे ग्रामसेविका ताई गायकवाड यांनी सांगितले. तर गावातील नागरिकांनी घाबरून न जाता मास्क व सॅनिटायझरचा करणे तसेच सामाजिक अंतर राखत कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करोना दक्षता समितीने केले आहे.