पुणे – एका घरफोडीच्या गुन्हयाचा तपास करताना विमानतळ पोलिसांनी एका आलिशान सोसायटीच्या माजी सुरक्षा रक्षकास जेरबंद केले आहे. त्याने सोसाटीतील बंद सदनिका फोडून तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. त्याच्याकडून 20 तोळ्याचे दागिने(10 लाख रुपये किंमत) हस्तगत करण्यात आले आहेत. त्याने हा गुन्हा साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुरक्षा रक्षक संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव(35,रा.लोहगाव) व त्याचासाथीदार संतोष उर्फ रॉकी अरुण धनवजीर(34,रा.लोहगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी चोरीचे दागिने विकलेल्या अशोक गणेशलाल जानी(54,रा.शनिवार पेठ, सातारा) याला विकले होते. यामुळे या गुन्हयात जानी यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
फिर्यादी सौरभ कुंदेन(मॅरिबल बिल्डींग, न्याती एव्हिटा, लोहगाव) हे त्यांच्या कुटूंबियासोबत 30 ते 31 डिसेंबर दरम्यान सदनिकेला कुलूप लावून कात्रज येथे वडिलांना भेटायला गेले होते. परत आल्यावर त्यांना घराच्या कपाटातील 25 तोळे दागिने चोरीला गेलेले आढळले. त्यांनी तातडीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तांत्रीक विश्लेषण व खबऱ्यांमार्फत माहिती काढली असता, न्याती एव्हिटा सोसायटीमध्ये पुर्वी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या लाराचे नाव पुढे आले. त्याला पोलिशी खाक्या दाखवतान त्याने रॉकी नावाच्या सहकाऱ्यासह चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा माल त्यांनी सातारा येथील जानी नावाच्या सराफास विकला होता. त्यालाही गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश धेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, हरुण पठाण, राहुल मोरे, किरण अब्दागिरे, वैभव खैरे, प्रशांत कापुरे यांच्या पथकाने केली.