उड्डाणपूल तर पाडला, आता पुढे काय?

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार

पुणे – शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक असणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील पूल पाडण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. याठिकाणी वाहतुकीचे व्यवस्थापन कसे असेल, याबाबत उत्सुकता असतानाच, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाने रस्ते पुनर्बांधणी केल्यानंतरच विद्यापीठ चौकातील वाहतुकीचे नियोजन करणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल आणि रेंजहिल्स चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम दि.13 जुलैपासून सुरू झाले होते. पाषाण, बाणेर, औंधकडे जाणाऱ्या पुलाकडील भाग पाडण्यासाठी चतु:शृंगी वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतुकीत बदल केले होते. सध्या पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून, रस्ता पुनर्बांधणीचे काम सुरू आहे.

नेहमी वाहतूक कोंडी होत असलेल्या या चौकात वाहतूक सुरळीत आणि विना अडथळा सुरू ठेवणे, हे वाहतूक शाखेसाठी आव्हानात्मक काम असणार आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या वाहतूक कमी असल्याने फारशी अडचण जाणवत नाही, येथील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच भविष्यातील वाहतुकीबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. या मार्गावरील सिग्नलची रचना, आराखडा तयार आहे.

पाडलेल्या पुलाचा रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे. पुणे विद्यापीठाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन चौकांबाबत नियोजन सुरू आहे. पूल असतानाची वाहतूक आणि सध्याची वाहतूक याचा अभ्यास करून, वाहतुकीचा अंदाज घेऊन नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती चतु:शृंगी वाहतूक विभागाचे अधिकारी प्रकाश मोरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.