पिंपरी – पिंपरीतील घाऊक फुलबाजार सुरू होऊन महिनाभराचा कालावधी संपत आला असला तरीही अद्याप येथे समस्यांचा विळखा कायम आहे. फुलबाजारात पाणीपुरवठ्यासाठी नळजोड बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्याशिवाय, वीजपुरवठ्याची सोय देखील केलेली नाही. त्यामुळे फूल विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
पिंपरीमध्ये मध्यवर्ती फुलबाजार नसल्याने बऱ्याच वर्षांपासून घाऊक फुलबाजार सुरू करण्याची फूलविक्रेत्यांची मागणी होती. त्यानुसार पिंपरीतील क्रोमा शोरूम शेजारी महापालिकेकडून फुलबाजाराची व्यवस्था करून देण्यात आली. विक्रेत्यांसाठी 27 गाळे निश्चित करण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी मिळाल्यानंतर संबंधित जागेत 1 ऑगस्टपासून घाऊक फुलबाजार
सुरू झाला. महापालिकेने फुलबाजारासाठी आवश्यक जलवाहिनी टाकून दिली.मात्र, विक्रेत्यांसाठी आवश्यक नळजोड दिलेले नाही. त्यामुळे विक्रेत्यांना सध्या येथे पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्याशिवाय, महावितरणकडून गाळेधारकांना वीज मीटर आणि मुख्य वीजपुरवठा अद्याप दिलेला
नाही. सकाळी सहाच्या सुमारास फुलबाजार सुरू झाल्यानंतर वीज व्यवस्था नसल्याने फूल विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
चिखलमय रस्ता ठरतोय त्रासदायक
घाऊक फुलबाजारात अंतर्गत चांगला रस्ता केलेला नाही. पाऊस पडल्यानंतर येथील परिसरात चिखल साचलेला असतो. त्यामुळे फुल विक्रेत्यांसोबतच ग्राहकही त्रस्त झाले आहेत. स्थानिक नगरसेवकांकडे पेव्हिंग ब्लॉक बसवून देण्याची मागणी केली होती. ब्लॉक बसविल्यास त्रास कमी होईल, असे फुल विक्रेते गणेश आहेर यांनी सांगितले.
‘घाऊक फुलबाजारात महापालिकेने रस्ता करून देण्याची गरज आहे. त्याशिवाय, विक्रेत्यांना पाण्याचे नळजोड द्यायला हवे. महावितरणकडून वीजमीटर आणि वीजपुरवठ्याची सोय व्हायला हवी. वीजपुरवठ्याची सोय झाली नसल्याने दररोज पहाटे फुल विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्यांना अंधारातच बसावे लागते.’
– राजकुमार मोरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड फुलबाजार आडते संघ