पुरामुळे साखर उद्योगासमोरील अडचणी वाढणार

पुणे – पश्‍चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळख असलेल्या सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. हजारो हेक्‍टर उसाचे क्षेत्र बाधित झाल्याने, यंदाच्या गळीत हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. ऊस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून आगोदरच अडचणीत सापडलेल्या साखर कारखानदारीसमोरील आव्हाने वाढण्याची शक्‍यता आहे.

जगात साखर उत्पादन करणाऱ्या देशांत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांची साखर पट्टा अशी ओळख असून, राज्यातील सुमारे 50 पेक्षा अधिक साखर कारखाने या 3 जिल्ह्यांतच आहेत. याठिकाणचे अर्थकारण आणि राजकारणही या साखर उद्योगांभोवती फिरत असते. यंदा आलेल्या पुराचा या जिल्ह्यांना फटका बसला आहे. यापैकी कोल्हापूरमधील 68,610, सांगली 20,571 तर सातारा 23,116.53 हेक्‍टर शेत्र बाधित झाले आहे.

त्यामध्ये सर्वाधिक ऊस लागवडीचे शेत्र आहे. एकट्या कोल्हापुरात 26 लाख 73 मेट्रीक टन ऊस हातचा गेला आहे. ऊस उत्पादकांना त्याचा 800 कोटींचा फटका बसण्याचा अंदाज आहे. पुराचे पाणी ओसरून परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. तर महसूल विभागानेही अंदाजे दर्शविलेली आकडेवारी असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पुरामुळे उसाचे क्षेत्र बुडाल्याने, त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आतापासूनच वर्तविली जात आहे. परिणामी पश्‍चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणालादेखील त्याचा फटका बसू शकतो.

साखर उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण
सध्या उत्तर प्रदेशमधील साखर कारखानदारीकडून शास्त्रोक्‍त पद्धतीने होणाऱ्या साखर उत्पादनाचे मोठे आव्हान महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसमोर आहे. आता त्याचात आसमानी संकटाने या उद्योगासमोरील अडचणीत भर घातली आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये आता महसूल व कृषी विभागाच्या संयुक्‍त विद्यमाने पंचनामा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर आतापर्यंत झालेल्या अतिरिक्‍त साखर उत्पादनामुळे राज्यात 65 लाख टन साखरेचा साठा पडून आहे. त्यातच यंदाच्या साखर उत्पादनात घट झाल्यास, गेल्यावर्षीच्या या साखर साठ्याचा मोठा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच साखर उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.