पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आल्याने सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमध्ये आलेला पूर ओसरला आहे.
मागील दोन दिवसांपासून खडकवासला धरणसाखळीत मोठ्या प्रमाण पाऊस सुरू असल्याने रविवारी रात्रीपासून मुठा नदीत सुमारे ४५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.
त्यामुळे एकतानगरी परिसरातील तीन ते चार सोसायट्यांच्या तळमजल्यात पाणी घुसले होते. मात्र, सोमवारी पहाटे हा विसर्ग ३५ हजार, तर दुपारी तो २१ हजार करण्यात आला. त्यानंतर पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.
सायंकाळी पुराचे पाणी पूर्णत: कमी झाल्याने पूर ओसरला होता. सायंकाळी पाणी घुसलेल्या तीन ते चार सोसायट्या वगळता उर्वरीत सर्व १६ सोसायट्यांचा वीजपुरवठाही महावितरणकडून तातडीने सुरू करण्यात आला.
स्वच्छतेला सुरुवात
सोमवारी दुपारी पाणी कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी महापालिकेकडून तत्काळ ज्या सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते, त्या भागात स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली. याशिवाय पाणी आल्यानंतरही अनेक सोसायट्यांमधील नागरिक रविवार असल्याने घरीच थांबले होते.
त्या नागरिकांसाठी महापालिकेकडून तत्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले, तसेच महापालिकेकडून फिरते दवाखान्याद्वारे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
याशिवाय काही सोसायटयांच्या पाण्याच्या टाक्याही तत्काळ महापालिकेकडून स्वच्छ करून देण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकेकडून जेटिंग मशिन, स्वच्छता कर्मचारी, औषध फवारणीसाठी कर्मचारीही नियुक्त करून देण्यात आले होते.
अग्निशमन दलाचे कौतुक
नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने एकतानगरी भागात ३ फायर गाड्या, २ बोटी, १५ जवान सलग दोन दिवस तैनात करण्यात आले होते, तर अग्निशमन दलाकडून प्रत्येक दोन तासाला खडकवासला धरणाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवून विसर्गाची नियमित माहिती घेतली जात होती.
याशिवाय पूर आल्यानंतरही लष्कराच्या जवानांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अनेकांना बाहेर काढत मोलाची भूमिका निभावली. त्याबाबत या भागातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.