पुणे (प्रतिनिधी) – शहरातील घरफोडीच्या सत्राचा फटका एका निवृत्त पोलीस महासंचालकाला बसला आहे. त्याची कोंढवा भागातील उंड्री परिसरात असलेल्या एका उच्चभ्रु सोसायटीत सदनिका फोडण्यात आली. या सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी दोन सदनिकांचा दरवाजा दरवाजा तोडून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यापैकी एक सदनिका निवृत्त पोलीस महासंचालकांची आहे.
श्याम खंते (67 ) यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा भागातील उंड्री परिसरात न्याती विंडसर सोसायटीचे खंते अध्यक्ष आहेत. या सोसायटीतील रहिवासी राज खिलनानी आणि नैला रिझवी हे बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सदनिका गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. खिलनानी हे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक आहेत. ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख होते. सदनिका मालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या सदनिकेतून नेमका किती ऐवज चोरीला गेला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर मार्च महिन्यात निवृत्त पोलीस महासंचालक राज खिलनानी हैद्राबाद येथे गेले होते. न्याती विंडसर सोसायटीत शिरलेल्या तीन चोरट्यांना सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी कैद केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करत आहेत.