लखनौ -उत्तरप्रदेशात झिका विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण आढळला. त्यामुळे त्या राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. झिकाचा फैलाव रोखण्यासाठी काही पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.
कानपूर जिल्ह्यातील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला झिकाबाधा झाल्याचे समोर आले. काही दिवसांपासून तापामुळे आजारी असल्याने त्या अधिकाऱ्याला हवाई दलाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही गूढ लक्षणे जाणवल्याने त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले.
त्या तपासणीतून संबंधित रूग्णाला झिकाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे आणखी 22 नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. देश अजूनही करोना संकटाशी झुंजत आहे.
उत्तरप्रदेशातील करोना फैलाव काही दिवसांपासून नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. अशात त्या राज्यात झिका विषाणूने प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या राज्यातील आरोग्य यंत्रणांनी आणखी एका विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशातून हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही तातडीने दखल घेऊन तज्ञांचे पथक कानपूरला पाठवल्याचे समजते.