जुन्नर तालुक्‍यात पहिला बळी

बाधितांची संख्या एकोणीसवर

बेल्हे -औरंगपूर (ता. जुन्नर) येथील एका 58 वर्षे पुरुषाचा कोविडं 19 या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती गावचे तलाठी विजय फलके यांनी दिली. ही व्यक्ती औरंगपूर गावामध्ये 18 मे रोजी मुंबईवरून आली होती.

करोनाची लक्षणे दिसत असल्याने या रुग्णाला 27 मे रोजी पुणे येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 28) रात्री उशिरा या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला व शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. औरंगपूर गाव व आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील गावे यामध्ये पारगाव निमगाव सावा हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

सध्या तालुक्‍यात धोलवड 3, सावरगाव 5, मांजरवाडी 2, खिलारवाडी 1, पारुंडे 2, आंबेगव्हाण 2, डिंगोरे 1, धालेवाडी तर्फे मिन्हेर 1, औरंगपूर 1, विठ्ठलवाडी वडज येथील 1 असे एकूण 19 रुग्ण नोंद असून, डिंगोरे येथील रुग्ण बरा झाला आहे.

औरंगपूर येथील रुग्ण उपचारा दरम्यान मृत झाला असल्याने गावामध्ये कोणत्याही व्यक्तीला पुढचे 28 दिवस येण्यास व जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले असल्याचे तलाठी विजय फलके यांनी सांगितले. मृत व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन कोविड-19च्या तपासण्या करण्याचे काम सुरू आहे. तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, गट विकास अधिकारी विकास दांगट, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी तात्काळ गावाला भेट देऊन सुरक्षिततेच्या सूचना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.