हरेश व्यास यांच्या “रिझवान” सिनेमाचे प्रदर्शनाच्या दिशेने पहिले पाऊल   

मुंबई : हरेश व्यास यांची निर्मिती आणि दिग्दर्शिन असलेल्या ‘रिझवान’ या बहुप्रतिक्षित सिनेमाने प्रदर्शनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नामांकित अतिथी, सिनेमातील कलाकारमंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.

एका सत्य कथेने प्रेरित होऊन तसेच एका प्रामाणिक व्यक्तीच्या जीवनाचा आलेख दाखवणारी या सिनेमाची मूळ कथा आहे. ज्याबद्दल प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह आणि आतुरता पाहायला मिळतेय. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना हा अर्थपूर्ण सिनेमा प्रेरणादायी ठरून सिनेक्षेत्रात मैलाचा दगड ठरण्याची अपेक्षा दिग्दर्शक हरेश व्यास यांनी व्यक्त केली आहे. सिनेमाचे लेखन डॉ. शरद ठक्कर यांनी केले आहे. अभिनेता विक्रम मेहता, केयूरी शाह, भार्गव ठाकर, जल्पा भट्ट, गौरव चंसोरी, दिगीषा गज्जर, सोनू मिश्रा, सागर मसरानी, हितेश रावल, चिराग कटरेचा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘रिझवान’ सिनेमाचे संगीत जादुई दुनियेत घेऊन जाते. सिनेमातील “शुकर है व्याधि नथी” हे गाणं संगीतकार सोहेल सेन यांनी संगीतबद्ध तर गीतकार अनिल चवडा, भावेश भट्ट यांनी शब्दबद्ध केलं असून प्रख्यात गायक अल्तामाश फरीदी यांनी या गाण्याला आपला भावपूर्ण आवाज दिला आहे.

या सिनेमातील “आओ सबको सिखालाये” हे प्रेरणादायी गाणं प्रख्यात गायक उदित नारायण यांनी गायले असून सोहेल सेन यांनी संगीतबद्ध तर गीतकार अनिल चवडा, भावेश भट्ट यांनी शब्दबद्ध केलं आहे. सिनेमातील विशेष आकर्षण म्हणजे “कनिम्म्बो” हे पोर्तुगीज भाषेतील गाणं  दिग्दर्शक हरेश व्यास यांनी स्वत: लिहिलं असून या कामात निल्जा यांची मदत त्यांना मिळाली. या गाण्याचं संगीत फ्रान्सिस्को फॉर्चुना यांनी दिलं असून मॅरिओन यांनी गाणं गायलं आहे.

हरेश व्यास यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या सिनेमाबद्दल ते म्हणतात, “रिजवान च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर दिसणारी मेहनत म्हणजे एक स्वप्नच आहे जे आता खरं होतंय आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद आहे. वास्तविक कथेवर आधारित या सिनेमाला पूर्णतः न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे अतिशय आव्हानात्मक होतं. एखाद्या व्यक्तीच्या प्रवासाला सिनेमाच्या रीतीने पुन्हा तयार करणे नक्कीच कठीण होते जे वास्तविकता अबाधित ठेवत प्रेक्षकांचे मनोरंजनही करते. सर्व कलाकार मंडळींनी त्यासाठी मनापासून कष्ट घेतले आहेत आणि प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल.”

प्रख्यात व्यावसायिक आणि समाजसेवक रिझवान अडतिया यांची यशस्वी वाटचाल भारत आणि भारतीयांना वास्तविक जीवनात नक्कीच प्रेरणा देणारी आहे. या कार्यक्रमात उपस्थित असताना ते म्हणाले, “माझ्या प्रवासाचा मला खूप अभिमान वाटतो जो एखाद्याला प्रेरणा देऊ शकेल. मोठी स्वप्ने उराशी बाळगुन कामाच्या शोधात असलेला एक लहान मुलगा असा विविध अडथळ्यांचा मार्गक्रम असलेला माझा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मी पाहिलेली स्वप्ने साध्य करणे अजिबात सोपे नव्हते. एक गोष्ट मात्र मला ठाऊक होती की, प्रयत्न सोडून हार मानणे हा माझ्याकडे पर्याय नव्हता. आज हा सर्व प्रेरणादायी प्रवास सिनेमाच्या रूपात पाहून मला आनंद होत आहे”

‘रिझवान’ चित्रपटात अडातिया यांची यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता विक्रम मेहता म्हणाला, “मला रिजवान अडातिया यांची प्रमुख भूमिका सिनेमात करण्यास निवडले गेले याचा मला खूप अभिमान वाटतो. दिग्दर्शक हरेश व्यास यांच्या मनातील पात्र साकारण्यासाठी मी ऑडिशन दिली जी अजिबात सोपी नव्हती. ही भूमिका वठवण्यासाठी मी त्यांची बरीच माहिती मिळवली, त्यांच्याबद्दल जवळून जाणून घेण्यासाठी अडातिया यांना भेटलो देखील. त्यामुळे माझी मेहनत किती यशस्वी झाली याचा निर्णय आता प्रेक्षकच घेतील”

Leave A Reply

Your email address will not be published.