काबुल : अमेरिकी सैन्याने देश सोडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. २० वर्षाहून अधिक काळ चाललेल्या प्रदीर्घ युद्धाला अखेर पूर्णविराम लागला आहे. शेवटच्या अमेरिकी विमानाने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अफगाणिस्तान अधिकृतपणे अमेरिकन सैन्यापासून मुक्त आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. त्यांचा हाच आनंद त्यांनी साजराही केला आहे.
अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार तसेच आतिषबाजी करत आपला आनंद साजरा केला आहे. २० वर्षांच्या लष्करी हस्तक्षेपानंतर अमेरिकेच्या सैन्याने देश सोडल्यानंतर काही तासांनंतर अफगाणांचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले.
काबूल विमानतळाच्या धावपट्टीवरून तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, “अफगाणिस्तानचे अभिनंदन … हा विजय आपल्या सर्वांचा आहे. आम्हाला अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्ही त्या सर्वांशी चांगल्या राजनैतिक संबंधांचे स्वागत करतो”
“अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ सोडले आहे आणि आपल्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे,” असेही तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी सांगितले. विजयाचा आनंद साजरा करताना तालिबान्यांनी फटाके फोडत आकाशात गोळीबार केला. तालिबान्यांनी शेवटचे अमेरिकी विमान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीच्या आकाशात पाहिल्यानंतर त्यांच्या हवेत गोळीबार केला आणि फटाके उडवले.