प्राधिकरणाचा 48 वा वर्धापन दिन
– दीपेश सुराणा
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शनिवारी आपला 48वा वर्धापन दिन साजरा केला. यानिमित्ताने प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांनी प्राधिकरणाचा उद्देश आणि भविष्यातील योजनांबाबत दैनिक “प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीत विचार व्यक्त केले. प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 12 आणि वाल्हेकरवाडी येथील गृहयोजना हे दोन महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प सध्या सुरू आहेत. पेठ क्रमांक 12 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना अवघ्या दहा लाखांमध्ये वन बीएचके सदनिका मिळू शकणार आहेत. सध्या सुरू असलेले गृहप्रकल्प पूर्ण करण्यावरच प्रथम भर दिला जाणार आहे.
सध्या कोणत्या विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे?
– प्राधिकरणाकडून सध्या प्राधान्याने पेठ क्रमांक 12 आणि वाल्हेकरवाडी येथील गृहयोजना पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. पेठ क्रमांक 12 येथे 9.43 हेक्टर क्षेत्रामध्ये गृहप्रकल्प उभारला जात आहे. 11 मजली 45 इमारतींमध्ये ही घरे होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांसाठी 3 हजार 317 तर, अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) 1 हजार 566 सदनिका उभारल्या जाणार आहेत. ईडब्ल्यूएसमधील वन बीएचके सदनिकेचे कार्पेट क्षेत्र 317.53 चौरस फूट तर, टू बीएचके सदनिकेचे कार्पेट क्षेत्र 637.86 चौरस फूट इतके क्षेत्र असणार आहे. या प्रकल्पात वन बीएचके सदनिका 9.90 लाखांपर्यंत उपलब्ध होणार आहे. वाल्हेकरवाडी येथील गृहयोजनेते एकूण 792 सदनिका उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये 378 सदनिका या वन रूम किचन तर, 414 सदनिका या वन बीएचके प्रकारातील असणार आहेत. वन रूम किचन सदनिकेचे कार्पेट क्षेत्र 274.69 चौरस फुट तर, वन बीएचके सदनिकेचे कार्पेट क्षेत्र 372.18 चौरस फूट इतके असणार आहे. या दोन्ही गृहप्रकल्पांचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
अन्य पेठांमध्ये देखील गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे का ?
– आर्थिक बाजू पाहिल्यास प्राधिकरणाच्या अन्य पेठांमध्ये उपलब्ध होणाऱ्या जागांवर सद्य:स्थितीत तरी लगेचच गृहप्रकल्प उभारणे अवघड आहे. पेठ क्रमांक 12 आणि वाल्हेकरवाडी गृहयोजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर अन्य गृहप्रकल्पांबाबत विचार केला जाईल.
कोणत्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहात?
– मोशी येथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात येथे खुले प्रदर्शन केंद्र उभारले जात आहे. 20 हेक्टर जागेत होणाऱ्या या केंद्राचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. संबंधित केंद्र नावारूपाला यावे, या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. तसेच, केंद्राच्या जागेचा उद्योगांना प्रदर्शन भरविण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकणार आहे.