पहिला टप्पातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

मुंबई – देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाल्यानंतर उद्या, मंगळवारी पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदासंघात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महाराष्ट्रातील विदर्भाच्या सात मतदारसंघात गुरुवार, 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार संपत असल्याने 9 एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला विदर्भातून सुरूवात होत आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा सात मतदारसंघात निवडणूक होत आहे. येथील निवडणूक प्रचाराला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरूवात झाली होती. आता शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. मोठ्या प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केल्यानंतर उद्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचा भर पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठी, रोडशो यावर असणार आहे. उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार असल्याने पारा चढलेला असताना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न राहणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी दिग्गजांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.