लंडन – विख्यात ब्रिटीश अभिनेते आणि बॉन्डपटांचे एकेकाळचे नायक सीन कॉनेरी यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. इयान फ्लेमिंग यांनी लिहीलेली ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बॉन्डची व्यक्तिरेखा कॉनेरी यांनी तब्बल 7 बॉन्डपटांमध्ये साकारली होती.
सिनेक्षेत्रातील काही दशकांच्या कारकिर्दीमध्ये कॉनेरी यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये “द हंट फॉर रेड ऑक्टोबर’, “इंडियाना जोन्स ऍन्ड द लास्ट क्रूसेड’, “मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ आणि “द रॉक’ यासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
कॉनेरी यांनी जेम्स बॉन्डची व्यक्तिरेखा सर्वप्रथम 1962 साली “डॉक्टर नो’ या बॉन्डपटामध्ये साकारली होती. त्यानंतर “फ्रॉम रशिया विथ लव्ह'(1963), “गोल्डफिंगर'(1964), “यु ओन्ली लिव्ह ट्वाईस'(1967), “डायमंडस आर फॉरेव्हर'(1971) आणि “नेव्हर से नेव्हर अगेन’ (1983) या बॉन्डपटांमध्ये ते जेम्स बॉन्डच्या व्यक्तिरेखेमध्ये प्रेक्षकांसमोर आले.
1987 साली ब्रायन डी पाल्मा यांच्या “द अनटचेबल’ मधील सहायक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी कॉनेरी यांना ऑक्सर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.