पहिला विचार हायटेक प्रचार

– सागर ननावरे 

निवडणुका जाहीर झाल्या की, सर्वांना प्रचाराचे वेध लागत असतात. उमेदवार कोणत्या पद्धतीने प्रचार करणार याची मतदारांत कमालीची उत्सुकता असते. फार पूर्वी टांगे, घोडागाडी, बैलगाडी या साधनांनी गावोगावी प्रचार केला जायचा. त्यानंतर जीपगाडी, रिक्षा, व्हॅन यांना कर्णकर्कश करणे लावून गावोगावी उमेदवारांचा प्रचार केला जायचा. सुरुवातीला या गाड्यांत एक व्यक्ती प्रचाराची स्क्रिप्ट वाचत असे. यांनतर रेकॉर्डिंग सिस्टीमने क्रांती केली. त्याचसोबत उमेदवारांची पत्रके वाटून आश्वासनांची खैरात मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली. घरोघरी ही पत्रके पोहोचू लागली. तसेच दारोदारी उमेदवारांचे स्टिकर्स नजरेस येऊ लागले. आजही यातील बऱ्याच पारंपरिक प्रचार पद्धतीचा अवलंब ग्रामीण भागात होताना दिसतो. परंतु तंत्रज्ञानाने अनेक बदल घडवून आणायला सुरुवात केली. बदलत्या काळानुसार प्रचाराचे तंत्रही बदलत गेले.

आता तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक प्रचारापेक्षाही हायटेक प्रचाराला अधिक महत्त्व दिले जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हायटेक प्रचार यंत्रणेने स्वतःला सिद्धही केले आहे.

सध्या सोशल मीडियाने अवघ्या प्रचारयंत्रणेचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. समाज तांत्रिकदृष्ट्या स्मार्ट होत असताना राजकीय व्यूहरचनाही तितकीच आधुनिक आणि स्मार्ट होताना दिसत आहे. कारण सोशल मीडियामध्ये सत्तापालटाची असणारी प्रचंड ताकद मागील काळात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच सिद्ध झाली आहे.

अमेरिकेतील 2008 ची निवडणूक ओबामा यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून निवडणूक जिंकली होती. यात त्यांना फेसबुक आणि मायस्पेस या सोशल मीडियाच्या संसाधनांचा मोठा फायदा झाला होता. इंटरनेट ने मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे सोशल मीडिया हे राजकीय पक्षांना उमगले आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. सध्या भारतात 56 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यात 30 कोटींहून अधिक फेसबुक युजर्स, 20 कोटींहून अधिक दरमहा ऍक्‍टिव्ह व्हॉट्‌सऍप युजर्स आहेत. ही आकडेवारीच भारतातील सोशल मीडियाची लोकप्रियता स्पष्ट करणारी आहे.

तरुणाईचा उत्साह निवडणुकांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत असतो. त्यातही तरुणांचा सर्वाधिक भर हा इंटरनेट वर असल्याने त्याचा फायदा राजकीय पक्षकार घेताना दिसतात. पूर्वी रोटी, कपडा आणि मकान वर निवडणूक लढविल्या जायच्या. परंतु आता मोबाईल, टॅब, इंटरनेट सेवा, लॅपटॉप आणि डिजिटलायझेशन यांच्या नावाखाली निवडणूक लढविल्या जात आहेत.

सध्या लोकसभा निडणुकांनी एक वेगळाच माहोल तयार केला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांनी व इच्छुकांनी व्हॉटस्‌ ऍप, फेसबुक, यू-टय़ुब, ट्‌विटर, इंस्टाग्राम, टिकटॉक इ. चा आधार घेतला असून त्या ऑपरेट करण्यासाठी स्वतंत्र मानवी यंत्रणाही सज्ज केली आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाच्या प्रचारासाठी घेतलेले ई-कार्यकर्ता मेळावे तसेच सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळाही सध्या फलदायी ठरत आहेत. या कार्यशाळांचे माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर आरोप वा टीका झाल्यानंतर लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याची संधी उपलब्ध होत आहे. सोशल मीडियावर चालणारे हे सोशल वॉर युवकांना व मतदारांना पक्षाकडे किंवा इच्छुक उमेदवाराकडे आकर्षित करणारे ठरत आहे.

पक्षाचे स्वतंत्र टायटल सॉंग’, पक्षातील ज्येष्ठ व प्रभावशाली नेत्यांच्या भाषणांच्या चित्रफिती, पक्षाने काढलेले मोर्चे, केलेली आंदोलने यांच्या क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल होऊन अक्षरश धुमाकूळ घालत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत शहरी भागात फ्लेक्‍स, बॅनर, पत्रके, पोस्टर आदी प्रचार साहित्य छापण्यासाठी होणारी चढाओढ आणि प्रचारपत्रके मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभी केली जाणारी कार्यकर्त्यांची फळी तितकीशी दिसून येत नाही. आता बदलत्या काळानुसार कमी वेळेत अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन प्रचार लाभदायक ठरणार असल्याने सोशल मीडियाच्या हायटेक प्रचार प्रणालीला पर्याय नाही. आता प्रत्येक पक्षाने सोशल मीडियाला आपला सारथी बनविले आहे. परंतु सोशल मीडियाच्या वापरातील परिणामकारकता आणि प्रत्यक्ष भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया तारणार की मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.