हिपहाॅप मध्ये मुंबईची मुळ भाषा आगरी-कोळी भाषेला स्थान मिळवण्यासाठी 6 तरुण कलाकारांनी प्रबोधनात्मक व रंजक विषयातील रॅपचे नुकतेच सादरीकरण केले आहे.
लॉकडाऊन मधील वेळेचा सदुपयोग करीत घरात राहून मोबाईलवरच रेकाॅर्ड तसेच व्हिडीओ शुट करून ‘आगरी कोळी फ्रीवर्स 2020’ हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आगरी कोळी भाषेतील हा पहिला हिपहॉप रॅप सायफर आहे. बोलीभाषा संवर्धन व जपण्यासाठी अलिबाग, नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि भिवंडीतील तरुण कलाकारांनी हा अनोखा प्रयोग केला आहे.
‘साधा काम नाय आपला’ म्हणत आगरीबाॅय सर्वेश तरे यांनी ओरडून गाणाऱ्या गायकांवर टिप्पणी केली आहे. रिध्देश यांनी दिखाऊपणाची यारी करणाऱ्या लोकांवर आपली खंत व्यक्त केली आहे. अशाच प्रकारे इतर रॅपरही आपली भावना विविध विषय घेऊन या रॅप सायफर आगरी-कोळी बोली मध्ये व्यक्त झालेत.
सायफर म्हणजे विविध रॅपर एकत्र मिळून रॅप करतात त्याला सायफर म्हणतात. तसेच फ्रिवर्स म्हणजे रॅपरचे प्रत्येकाचे वेगवेगळे कडवे, ज्याचा विषय एकमेंकापासुन भिन्न असतो असे कवी व रॅपर सर्वेश तरे यांनी वृत्त माध्यमांना सांगितले आहे.
या कार्यक्रमाचे संगीत संयोजन डीजे स्लीमिलींद यांनी केले आहे. सर्वेश तरे, चिराग भोईर, स्लिमिलींद, प्रणित गदमळे, योनेश पाटील, रिध्देश तरे या रॅपरचा ‘आगरी कोळी फ्रीवर्स 2020’ हा बोली भाषा संवर्धनासाठी होणारा वेगळा आणि हिपहाॅपसाठी पहिला प्रयोग आहे. हे गीत नुकतेच युट्यूबवर प्रदर्शीत झाले आहे.