आधी थोपटले दंड अन् परत झाले थंड!

सातवांच्या मध्यस्थीने भोस-जाधव यांच्यात 'समझोता' ; दोघांच्या वादात तिसऱ्याचीच बदली

श्रीगोंदा  (प्रतिनिधी) – ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आणि पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या वादात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने एकमेकांविरुद्ध दंड थोपटलेले दोघेही लगेच थंड झाले. दरम्यान, भोस-जाधव वादात पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांची मात्र बदली झाली.

ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी पोलीस निरीक्षक जाधव यांची ‘भांडाफोड’ करण्याची तयारी चालवली होती, तर दुसरीकडे जाधव यांनी देखील पोलीस कॉन्स्टेबल पितळे यांच्याशी भोस यांच्या झालेल्या वादग्रस्त संभाषणानंतर फिर्याद नोंदवीत भोस यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दोघांनीही एकमेकांविरुद्ध दंड थोपटीत एक पाऊल पुढे टाकले होते. भोस-जाधव वादातून अनेक नवीन वादांना तोंड फुटण्याची शक्यता लक्षात घेत, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आणि पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी बैठकांवर बैठक घेतल्या. सातव यांनी हे प्रकरण जागीच मिटविण्यासाठी भोस यांची दोन दिवसांत तब्बल तीनदा भेट घेतल्याची माहिती समजली. अखेर सातव यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली. सातव यांना भोस-जाधव यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी तालुक्यातील दोन नेत्यांची ‘विशेष’ मदत ‘लाभल्याची’ चर्चा होती. त्यानंतर, रविवारी (दि.24) सकाळी भोस-जाधव या दोघांनीही दोन पावले मागे येण्याची भूमिका घेत ‘समझोता’ केला.

याबाबत ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी आपण दोन पावले मागे घेत समझोत्याची भूमिका घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, मनोहर पोटे, दीपक भोसले आदी उपस्थित होते, तर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पत्रकार परिषद घेत भोस-जाधव वादावर पडदा पडल्याचे सांगितले. तर पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांच्याविषयी काही तक्रारी आल्या असल्याने त्यांची तत्काळ बदली करीत असल्याचेही सांगितले.

दरम्यान, भोस-जाधव यांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल पितळे यांची मात्र बदली करण्यात आली आहे. पितळे यांची कार्यपद्धती, त्यांच्याविषयीच्या तक्रारी आणि त्याची सत्यता यासह इतर बाबी पोलीस चौकशीत समोर येतील, तो पुढचा विषय असला, तरी सध्या मात्र भोस-जाधव यांच्या वादावर ‘पडदा’ टाकण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल संदिप पितळे यांचाच बळी दिल्याची चर्चा रंगत आहे.

‘समझोता’ कशामुळे?

ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांना राजकीय पार्श्वभूमी आणि वलय असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी ‘ताकद’ पणाला लावून भोस-जाधव यांच्यात समझोता घडवून आणला. परंतु, एखाद्या सामान्य माणसाने अनावधानाने जरी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला अरेरावी केली असती, तर पोलीस अधिकाऱ्यांनी अशी समझोता करण्याची भूमिका घेतली असती काय? असा सवाल सामान्यजन उपस्थित करू लागले आहेत. भोस यांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने समझोता झाला की पोलिसांना आपले ‘पितळ’ उघडे पडण्याची भीती वाटल्याने समझोता हा सवाल मात्र अनुत्तरितच राहिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.