सीआरपीएफच्या 55 वर्षीय उपनिरीक्षकाचे निधन
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 55 वर्षीय उपनिरीक्षकाचे मंगळवारी करोना संसर्गामुळे निधन झाले. त्यामुळे केवळ सीआरपीएफच नव्हे; तर सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) मिळून करोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
करोनाचा संसर्ग झालेल्या सीआरपीएफच्या उपनिरीक्षकाला उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील सफदरजंग रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यांनी करोना संसर्गाशी दिलेली झुंज अयशस्वी ठरली.
ते मूळचे आसामचे रहिवासी होते. ते सीआरपीएफच्या दिल्लीस्थित तुकडीत रूजू होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. दरम्यान, सीआरपीएफबरोबरच सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासारख्या (सीआयएसएफ) इतर केंद्रीय दलांमध्येही काही करोनाबाधित आढळले आहेत. देशातील सर्वांत मोठे निमलष्करी दल असणाऱ्या सीआरपीएफमध्ये सुमारे 3.25 लाख जवान आणि अधिकारी आहेत. तर सर्व केंद्रीय दलांमध्ये मिळून सुमारे 10 लाख जवान आणि अधिकारी रूजू आहेत. त्या दलांवर अंतर्गत सुरक्षेबरोबरच देशाच्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी आहे.