राजगुरूनगर : राजगुरूनगर शहरात एक ३२ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, खेड प. स सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. राजगुरूनगर शहरात पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड तालुक्यात आज राजगुरूनगर शहर आणि कडाचीवाडीत प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याने आत्तापर्यंत एकूण ५८ जणांना कोरोना ची लागण झाली आहे. यातील ४० जण बरे होऊन घरी गेले आहेत तालुक्यात २ व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. सध्या १६ बाधित व्यक्ती उपचार घेत आहेत.
राजगुरुनगर शहरातील एका ३२ वर्षीय महिलेचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका हद्दीत कोरोनाची लागण झाली आहे. याला अपवाद राजगुरूनगर नगर परिषद होती मात्र आज एका ३२ वर्षीय आजारी महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नगर परिषद हद्दीतील हा पहिला रुग्ण आहे. तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरूनगर शहरात करोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राजगुरूनगर व कडाचीवाडी (चाकण) येथे गुरुवारी प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. कडाच्यावाडीतील रुग्णाच्या संपर्कात असलेल्या १७ जणांपैकी अनेकांना तपासणी करण्याअगोदर तापाची थेट लक्षणे दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे येथील रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. चाकण-३, येलवाडी -४, कडाचीवाडी -३,म्हाळुंगे, गोलेगाव, खराबवाडी प्रत्येकी एक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. साकुर्डी गावातील एक प्रसूती झालेली महिला म्हाळुंगे कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
राजगुरूनगर शहरात ३२ वर्षीय महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खेड प्रशासनाने तातडीची उपाययोजना आणि संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु केला असून कंटेनमेंट झोन करण्याची तयारी सुरु केली आहे. नागरिकांनी सतर्क राहून सोशल डिस्टन्स ठेवून गर्दीत जाणे टाळावे, मास्क सॅनिटायझरचा वापर करून नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.