देशभरातील रूग्णांची संख्या 152 वर
नवी दिल्ली : लेहमधील एका जवानाला करोनाची बाधा झाल्याचे बुधवारी समोर आले. त्यामुळे भारतीय लष्करात पहिल्या करोनाबाधिताची नोंद झाली. दरम्यान, देशभरातील करोनाबाधित रूग्णांची संख्या 152 वर पोहचली आहे.
लडाख स्काऊट तुकडीचा सदस्य असणाऱ्या 34 वर्षीय जवानाला करोनाची लागण झाल्याचे चाचणीने स्पष्ट केले. लेहमधील एका गावचा रहिवासी असणारा तो जवान 25 फेब्रुवारीपासून रजेवर होता. आठवडाभराने तो पुन्हा रूजू झाला.
रजेवर असताना वडिलांच्या संपर्कात आल्याने त्याला करोनाचा संसर्ग झाला. त्याचे वडील यात्रेसाठी इराणला गेले होते. तिथून परतल्यावर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. जवानाच्या भावालाही करोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, करोनाबाधित जवान आढळल्याने भारतीय लष्कराने त्या विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशातून तातडीने विविध पाऊले उचलली. त्यानुसार, रजेवरून परतणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.
अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना लष्कराने आपल्या सदस्यांना दिल्या आहेत. त्याशिवाय, युद्ध सराव, परिषदा आणि प्रशिक्षणालाही लष्कराकडून स्थगिती देण्यात आली आहे.