काबुल : काही महिन्यापूर्वी जगामध्ये एक घटना घडली आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवून आपली सत्ता स्थापन केली. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर तालिबानला सर्वातमोठा धक्का बसला आहे. कारण तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या इतक्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झाला आहे. हमदुल्लाह मुखलीस असे या तालिबानी कमांडरचे नाव आहे. काबुलमधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात मुखलीसचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे.
हमदुल्लाह मुखलीस कट्टरतावादी संघटना हक्कानी नेटवर्कचा सदस्य होता. त्याची सध्या बादरी स्पेशल फोर्सेसमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबानच्या एवढ्या वरिष्ठ नेत्याची हत्या झाली आहे.
मंगळवारी सरदार मोहम्मद दाऊद खान सैन्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ बॉम्बहल्ले करण्यात आले. त्यानंतर बेछूट गोळीबारही करण्यात आला. याला प्रत्युत्तर देताना तालिबानचा कमांडर हमदुल्लाह मुखलीस यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.