झोजिला पासवरील बोगद्यासाठीचा पहिला स्फोट

श्रीनगर खोरे-लेह दरम्यान वर्षभर प्रवास करता येणार

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमधील झोजिला बोगदयासाठीचा पहिला स्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घडवून आणला. या बोगद्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वर, श्रीनगर खोरे आणि लेह दरम्यान वर्षातील बाराही महिने अखंड वाहतूक सुरु राहू शकणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 द्वारे, श्रीनगर आणि लेहला द्रास आणि कारगिलमार्गे जोडणाऱ्या झोजिला पास या रस्त्यावरची वाहतूक, वर्षाचे फक्त सहा महिने सुरू असते. हा रस्ता वाहनाने जाण्यासाठीचा जगातील हा सर्वात धोकादायक रस्ता आहे. त्याच्या खालून जाणार असलेल्या या 14 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाचा प्रकल्प भौगोलिक दृष्ट्‌या संवेदनशील देखील आहे. हा आशियातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा असून यामुळे या प्रदेशातील सामाजिक- आर्थिक चित्र सुधारणार आहे. या बोगद्याच्या आराखड्याची पुनर्रचना केल्यानंतर 4000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. प्रामाणिक प्रयत्नांच्या मदतीने आपण आपल्या देशाचा कमी खर्चात विकास घडवून आणू शकतो असे गडकरी म्हणाले. वेळापत्रकानुसार या बोगद्याच्या कामाला सहा वर्ष लागणार आहेत.

जम्मू- काश्‍मीरमध्ये रस्त्यांवरील 7 बोगद्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काझीगुंड आणि बनिहाल दरम्यानचा 8450 मीटर लांबीचा दुहेरी बोगदा येत्या मार्चपर्यंत बांधून पूर्ण होईल. त्यानंतर रामबन आणि बनिहाल दरम्यान 2968 मीटर लांबीचे सहा एकपदरी बोगदे बांधण्याची कामे डिसेंबर 2021 मध्ये संपतील. तसेच खिलानी आणि किश्‍तवाड दरम्यानचा 450 मीटर लांबीचा बोगदा जून 2022 पर्यंत पूर्ण होईल.

चेन्नई-अनंतनाग बोगदा, सिंथन पासवरील बोगदा, खाख्लानी बायपास बोगदा तसेच छत्रू-अनंतनाग बोगद्यांच्या निविदा काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. दिल्ली आणि कटरा या महत्त्वाच्या शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या 650 किलोमीटर लांबीच्या दिल्ली-कटरा हरित द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी भूमी अधिग्रहणाचे काम सुरू आहे. हा महामार्ग जम्मू महामार्गाशी देखील जोडला जाईल, यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंची उत्तम सोय होईल असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.