जी आग तुमच्या हृदयात आहे, तीच माझ्याही हृदयात : पंतप्रधान मोदी

बिहारमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचा प्रारंभ

बराउनी (बिहार) – पुलवामा हल्ल्यानंतर देशाच्या जनतेच्या मनामध्ये जो राग, उद्‌वेग आणि संताप निर्माण झाला आहे. तो आपल्याही मनात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. उत्तर बिहारमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते काही विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी आयोजित जनसभेला संबोधित करताना मोदींनी पुलवामातील शहिदांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्थानिक “अंगिका’ भाषेतून केली आणि पुलवामातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी 2 मिनिटांचे मौन पाळले. या हल्ल्यात पाटण्याचे संजय कुमार सिन्हा आणि भागलपूरचे रतन कुमार ठाकूर हे जवान शहिद झाले होते. पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली. शहिद जवानांच्या कुटुंबीयांप्रति आपल्या सहवेदना आहेत. इथे जमलेल्या हजारो नागरिकांच्या हृदयामध्ये जी आग आहे, तीच आपल्याही हृद्‌यामध्येही आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

बिहारमध्ये आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलेल्या 33 हजार कोटींच्या विविध विकासकामांवर पंतप्रधानांनी विशेष भर दिला. या विकासकामांमुळे बिहारमधील जनतेचा सर्वसमावेशक विकास कसा होणार आहे हे पंतप्रधानांनी सविस्तरपणे सांगितले. “एनडीए’ आघाडी सरकारची विकासाबाबत दोन उद्दिष्टे आहेत. त्यातील एक पायाभूत सुविधांचा विकास आणि दुसरे उद्दिष्ट म्हणजे समाजातील मागासवर्गीयांचा विकास आहे. बिहारच्या जनतेने त्वरित निर्णय घेणारे, निर्णयांची अंमलबजावणी करणारे, निर्णय सत्यात उतरवणारे सक्षम आणि स्थिर राज्य सरकार निवडून दिले आहे, म्हणूनच ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होते आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देण्याच्या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल होईल. खुल्या वर्गातील आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण देण्यासाठी अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षण कोट्याला कोणताही धक्का लावला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बिहारचे प्रथम मुख्यमंत्री श्री कृष्ण सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगुसराइ बराउनी भागाचा औद्योगिक हब म्हणून विकास करण्यात आला. या औद्योगिक भागाच्या विकासासाठी नव्याने प्रयत्न केले जात आहेत. यातून बिहारच्या आर्थिक क्षमतेचा अधिक विकास होणार आहे, असेही नितीश कुमार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.