जमा रकमेपैकी 75 टक्के किंवा 3 महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढता येणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनी कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीएफ कार्यालयार्ते नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या पीएफच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम किंवा त्यांच्या मागील तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम (दोन्हीपैकी कमी असलेली रक्कम) नॉन-रिंडेबल ऍडव्हान्स म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहे.
केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या पीएफ कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीस्थित पीएफच्या मुख्य कार्यालयातर्फे या संबंधिच्या सूचना देशभरातील पीएफ कार्यालयांना दिल्या आहेत.
केंद्र सरकारने त्यासाठी पीएफ स्किममध्ये बदल करून पॅरा 68 एल पारित केला आहे. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर 31 भरणे अनिवार्य आहे. रक्कम मिळवण्यासाठी कर्मचारी ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमंग ऍपवरून ऑनलाइन अर्जाची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे पीएफ कार्यालयाच्या संकेतस्थळावरही फॉर्म 31 भरण्याची व्यवस्था आहे. याप्रकारचे दावे ऑटो-सेटलमेंट पद्धतीने निकाली काढण्यात येणार आहेत. अर्ज केल्यापासून 72 तासांमध्ये ही रक्कम कर्मचाऱ्यांस मिळणे आता शक्य होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पीएफ कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ देशभरातील साडेसहा लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
– अतुल कोतकर, आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय (पुणे विभाग)