#TestChampionship : …तरच भारतीय संघ पात्र ठरेल

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा

अहमदाबाद – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाचा 10 गडी राखून पराभव केला व आयसीसीच्या ( Test Championship ) कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा आपला दावा भक्कम केला.

इंग्लंडविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. मात्र, लागोपाठ दोन कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने पहिले स्थान मिळवले आहे. दुसरीकडे लागोपाठ दोन सामन्यात पराभूत झालेल्या इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

अहमदाबाद कसोटीनंतर आयसीसीने कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचे गुण व क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात भारतीय संघ पहिल्या स्थानावर आला असून पहिल्या स्थानावर असलेला न्यूझीलंडचा संध दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे.

भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 71 झाली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलडच्या विजयाची टक्केवारी 70 आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 69.2 आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील पहिल्या दोन संघात लंडनच्या एतिहासिक लॉर्डस मैदानावर अंतिम सामना होणार आहे.

अर्थात, अजूनही त्यात फेरबदल होऊ शकतात. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र चौथ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या स्थानासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांना समान संधी आहे.

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे गरजेचे आहे. अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत स्थान मिळवेल.

भारतासमोर आव्हान कायम….

न्यूझीलंडचा संघ कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता न्यूझीलंडविरूद्ध कोणता संघ खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारत व इंग्लंड चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-1 असा आघाडीवर आहे. इंग्लंडलाही अंतिम फेरीत खेळण्याची संधी होती. मात्र, अहमदाबाद कसोटी गमावल्यानंतर ती शक्‍यता संपुष्टात आली असून भारताने चौथा सामना जिंकला किंवा अनिर्णित राखला तरच भारताला कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठता येणार आहे. पण इंग्लंडने उर्वरित कसोटी जिंकली तर, भारतीय या स्पर्धेतून बाहेर पडेल व ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची लॉटरी लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.