होशिंगाबाद-भोपाळमध्ये अंतिम लढत रंगणार

31 वी अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती हॉकी स्पर्धा

पुणे: होशिंगाबाद आणि भोपाळ या दोन संघांदरम्यान येथे होत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर टुर्नामेंट समितीतर्फे आयोजित अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती हॉकी स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत होशिंगाबाद संघाने टायब्रेकमध्ये उत्तर प्रदेशवर, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भोपाळने चंदीगडवर मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात ही स्पर्धा सुरू आहे.

शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत होशिंगाबाद संघाने टायब्रेकमध्ये उत्तर प्रदेश संघावर 7-5ने मात केली. यात निर्धारित वेळेत लढत 3-3 अशी बरोबरीत सुटली. यात होशिंगाबाद संघाने पहिल्या दोन सत्रात वर्चस्व राखले. नरेश राठी (17 मि.), एम. सरताज (23 मि.) आणि मनोजकुमार (28 मि.) यांनी गोल करून होशिंगाबाद संघाला मध्यंतराला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे ही लढत एकतर्फी होईल, असे वाटले होते. मात्र, उत्तरार्धात उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या. यात विशाल सहारेने 36व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर, तर 37व्या मिनिटाला विशाल नरियाने मैदानी गोल केला. त्याचबरोबर 44व्या मिनिटाला साहिल दासने गोल करून उत्तर प्रदेश संघाला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत ही 3-3 बरोबरी कायम राहिली. यामुळे टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात होशिंगाबाद संघाकडून शानूकुमार, मनोजकुमार, नरेश राठी, एम. सरताज यांनी गोल केले.

उत्तर प्रदेश संघाकडून साहिल दास, रॉकी श्रीवास्तव यांनाच गोल करता आले.
दुसरी लढत एकतर्फीच झाली. यात भोपाळने चंदीगडचे आव्हान 4-0ने परतवून लावले. पहिल्या दोन सत्रात चंदिगडच्या खेळाडूंनी भोपाळला रोखून धरण्यात यश मिळवले. उत्तरार्धात मात्र भोपाळने आक्रमक खेळ केला. यात भोपाळकडून शानू महंमद (32 मि.), अहमदउल्लाह (34 मि.), रशीद (55 मि.) आणि समीर (57 मि.) यांनी गोल केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)