शिक्षण विभागातील फाईलींची दिरंगाई संपणार

नगर – जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कामे गतीमान झालेली असून अधिक गतीमान होण्यासाठी शिक्षणाधिकारी रमकांत काठमोरे प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांना आता त्यांच्या भविष्यनिर्वाहनिधी, वैद्यकीय बिले आदी फाईलची सध्या काय स्थिती असून ते कोणत्या टेबलवर आहे, याची माहिती आता सूचनाफलकाच्या माध्यमातून समजणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे काम गतीमान होण्यासाठी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे यांनी पुढाकार घेतलेला आहे.

त्यासाठी शिक्षण विभागातील वैद्यकीय बिले, भविष्यनिर्वाह निधी व इतर फाईलची स्थिती काय आहे, त्या नेमक्‍या कोठे अडकलेल्या आहेत, याची माहिती आता कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक व सोळा तारखेला समजणार आहे. ही सर्व माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या टेबलवर जाऊन त्यांच्याकडे विचारपूस करण्याचा शिक्षकांचा त्रास कमी झालेला असून कर्मचाऱ्यांच्या टेबलवरील गर्दीही कमी होऊन त्यांची कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे. प्राथमिक विभागांमध्ये आलेल्या फाईल या उपक्रमामुळे वेगाने पुढे सरकणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here